Saturday, October 24, 2009

पवनी

काही दिवसांपूर्वी भंडाऱ्याला गेलो होतो. तिथून जवळ एक पवनी म्हणून एक गाव आहे, वैनगंगेच्या काठावर. तिथे जातांना धानाची शेतं लागतात. चिनोर नावाच्या तांदळाचा वास भरून घायला छाती लहान पडते.पवनीला अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी एक वैनगंगेचं. जीवनदायी नदीची रोज पूजा होते तिथे. अनेक घरांना लागून लहान लहान देवळं. नदीचं विशाल पात्र सूर्यास्तानंतर बघण्यासारखं असतं.


Wednesday, September 30, 2009

पिकली पानं नाही, पिकली फळं


वृद्ध माणसांना पिकलं पान म्हणतात. मला वाटत की, आपण त्यांना पिकलं फळ का नाही म्हणत?

आपल्या पाठीशी कुणाचे तरी आशीर्वाद आहेत, ही भावना जितकी आत्मविश्वास देणारी आहे तितकीच आपल्या आशीर्वादाची कुणालातरी कदर आहे ही भावना सुखावणारी आहे. आई जेव्हा आजीला विचारते, 'हे करंजीचं सारण झालं की, अजून थोडं होऊ देऊ? तेंव्हा उत्तर देतांना आजीच्या चेहरा व त्यावरचं समाधान बघण्यासारखं व अवर्णनीय असतं.
आपल्या अनुभवांची शिदोरी पुढच्या पिढीला उपयोगी पड़ते आहे ही भावना खरच समाधानी देणारी असणार आहे…

मागच्या आणि पुढच्या पिढीतली मतांतरे, घर्षण अटल आहे. पण दोन गोष्टी एकमेकांना धरून राहण्यासाठी फ्रिक्शन आवश्यक असते तसं…


Saturday, September 12, 2009

एक न काढलेला फोटो

आज सकाळी फिरून परत येत होतो. पाषाण जवळ असणाऱ्या सोमेश्वरवाडी नावाच्या भागाला जो रस्ता पाषाणला जोडतो तिथे खूप सारं नवं बांधकाम सुरु आहे. एका अर्धवट बांधून झालेल्या टोलेजंग इमारतीसमोर एक सिमेंट मिक्सरच्या चाकावर एक लहान मळक्या कपड्याचं पोरगं बसलं होतं.

परफेक्ट फ्रेम होती फोटोसाठी. माझ्याकडे माझ्या नवीन फोन मधला कॅमेरा होतं. 3.2 मेगापिक्सेल. मी लगेच कॅमेरा बाहेर काढला. बरोबर त्या मुलाच्या समोर उभा राहिलो, असा की मागे सगळ्या मोठ्या इमारती दिसतील. 'भांडवलावाद्याच्या एक्सप्लॉयटेटिव' कृत्यांना हायलाईट करावं म्हटलं. फोटोग्राफीचे नियम लक्षात घेऊन फ्रेम लावण्याचा प्रयत्न केला. कॅमेरात बघत होतो तेव्हड्यात तिथे एक बाई येऊन उभी राहिली. त्या मुलाची आई असावी बहुतेक. तिच्या खांद्यावर अजून एक लहान मूल होतं. ती माझ्याकडे रागाने पाहात होती. नंतर लक्षात आला की ती गरोदर आहे. पोटात अजून एक बाळ.

माझ्या अंगावरून सर्रकन काटा आला. आपण काय करतो आहेत लक्षात आलं. नवीन कॅमेरा, पेपरमधली नोकरी करत असल्यामुळे आलेला माज क्षणात उतरला. जोसेफ पिंटो सरांचे तास, राजेंद्र महामुनी सरांचे फोटोजर्नालिझम तास आठवले. एक मैत्रिणीने 'पत्रकारितेतली मूल्यं फक्त वर्गापुरतीच असतात का?' असा विचारलेला प्रश्न आठवला. त्या गरिबीला ग्लोरिफाय करून मी माझी संवेदनेची गरिबी त्या फोटोतून लोकांना दाखवत फिरणार होतो.

आणखी एक 'फ्रेम' आता बदलावी लागणार होती...

Sunday, August 23, 2009

मला भेटलेली भक्ती


आज गणेश चतुर्थी आणि त्यात रविवार. पण आम्हाला ऑफ़िसला सुट्टी नाही. म्हटलं सणवार आहे, जरा बरे कपडे घालून बाहेर पडूया. घरातून बाहेर पडतांना विचार केला जातांना एखाद्या गणपतीच्या देऊळात जावं.
मी राहातो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडलं की समोर एक सुंदर, पाचूसारखी हिरवी टेकडी आहे आणि थोडं पुढे गेलं की अत्यंत देखणा पाषाण तलाव. या दोघांच्या मधे एक छान शंकराचं मंदिर आहे. तिथे एक काळ्या दगडातली गणपतीची मूर्ती आहे. तिथेच नमस्कार करून पुढे जायचं ठरवलं.
जिना उतरतांना उदबत्त्यांचा, फुलांचा आणि नैवेद्याचा एकत्रित वास येत होता. सुगंध आतल्या आरासाचं दृष्य डोळ्यांपुढे उभं करत होता. मी आता मंदिरातला गणपती पाहायला उत्सुक झालो होतो.
मंदिरात फारशी गर्दी नव्हतीच. गणपती तिथला मेन देव नसल्यामुळे असेल. एक जोडपं आणि त्यांची छोटी मुलगी असे तिघेच तिथे होते. मंदिराच्य आवारात शिरल्यावर चपला काढायला एक स्टॅंड आणि पाय धुवायला नळ आहे.
तिघही छान तयार होऊन आले होते. त्या छोट्या मुलीच्या हातात एक दूर्वांची जुडी आणि एक फुलांची माळ होती. तिघांनिही नळावर पाय धुतले. मुलीने पाय धुतल्यावर तिच्या बाबांनी तिला उचलून खान्द्यावर घेतलं. आत मी त्यांच्या मागेमागेच गेलो. मुलीने आपले इवलेसे हात वर करून घंटा वाजवली. शंकराच्या गाभाऱ्याच्या दारावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. त्या मूर्तीला तिने हार घातला. दूर्वा वाहिल्या. वडीलांच्या खांद्यावर बसूनच तिने नमस्कारही केला.
मनात आलं आपल्यातले बरेच लोक जसं काहीतरी देवाकडे मागतात तसं तिने काहीच मागीतलं नसणार. तिच्यासारखी भक्ती करता यायला हवी. निखळ. निर्व्याज.
गणपतीपुढे त्यांनी ठेवलेले छोटे छोटे मोदक तिने तिथल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. माझ्याजवळ आल्यावर मी तिला विचारलं
’तुझं नाव काय?’
ती कॉन्फ़िडंट्ली म्हणाली
’भक्ती.’
देवाच्या खऱ्या भक्ताचं दर्शन व्हायलाही नशिब लागतं म्हणतात.

Wednesday, August 19, 2009

वीकएंड कॉफी

तलाव कंटाळला स्तब्धतेला
वाटलं त्याला वाहात सुटावं
नदी बोअर झाली वाहतेपणाला
तिला वाटलं स्तब्ध राहावं

दोघं भेटले वीकएंडला, कॉफी प्यायला.
नदी म्हणाली
'जाम पकले रे वडवड करून'
तलाव बोलला
'सॉलिड कंटाळलो रुटीनला
जावं कुठं तरी निघून'

नंतर दोघांनी भरपूर गप्पा मारल्या
नदी बोलत होती
काठावरल्या लोकांबद्दल, त्यांच्या कष्टांबद्दल
उड्या मारणाऱ्या नागड्या पोरांबद्दल
स्वच्छ व्हायला येणाऱ्या गाई-गुरांबद्दल

कॉफीमुळे तजेला आलेला तलावही बोलला
मासे पकडणाऱ्या कोळ्यांबद्दल
डोंगराच्या सावलीबद्दल
बोटींग करणाऱ्या हसऱ्या जोडप्यांबद्दल

ठरलं, असंच वीकएंडला भेटायचं
TTMM बिल देऊन दोघं निघाले
नदी, तिच्या लोकांकडे, उड्या मारणाऱ्या पोरांकडे
तलाव, त्याच्या कोळ्यांकडे, डोंगराच्या सावलीकडे

Saturday, July 25, 2009

जॉब प्रोफाइल्स

काल बसमधून घरी परत येत होतो. खडकीला बस थांबली. लोक पायऱ्यांचा धडधड आवाज करत उतरले. समोरच्या दारातून एक विशीतला मुलगा चढला. ड्रायवरने त्याला भरपूर शिव्या दिल्या. कपड्यावरून अत्यंत गरीब दिसत असल्यामुळे नियम तोडल्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. दुसरीकडे कुठेच जागा नसल्यामुळे तो माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसला. त्या सीटवर एक मुलगी बसली होती. त्या मुलाच्या अंगाच्या येणाऱ्या वासामुळे तिने तोंड वाकडं केलं. मी पण.
त्या मुलाचे कपडे, डोळे, अंगाचा वास या सगळ्यातून त्याचा त्याने दिवसभर केलेले कष्ट आणि त्याचा थकवा जाणवत होता. कुठल्यातरी बांधकामाच्या साईटवर कामाला असावा. त्याने घातलेनी जुनी जीन्स खऱ्या अर्थाने स्टोनवॉश झाली होती. बस सुरु झाल्यावर खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे त्याला लगेच झोप लागली. ड्रायवरने ब्रेक दाबला की तो दोन सेकंदासाठी जागा व्हायचा आणि पुन्हा डुलक्या घ्यायला लागायचा.
मी अंदाजे त्याच्याच वयाचा. मी पण कामावरूनच परत येत होतो. आमच्या फक्त 'जॉब प्रोफाइल्स' वेगळ्या होत्या.
काही दिवसांपूर्वी वाचलेला श्रमजीवी आणि बुद्धीजीवी या दोन प्रकारच्या माणसांमधला फरक आठवला. तो विचार किती बोगस होता असं वाटलं. शरीराचे वेगवेगळे अवयव उपजीविकेसाठी वापरल्यावरून आपण माणसांचे वर्गीकरण करणे याच्यात BMR (बेसिक मध्ये राडा) आहे.
काही वर्षापूर्वीचा माझा आणि माझ्या भावामाधला संवाद आठवला. आम्ही त्याच्याकडे जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांच्या घरासमोर चालू असलेल्या बांधकामावरचे मजूर जेवत होते. भाकरी, कोरडं वरण असा बेत होता. सोबत ठेचा.
मी विचारलं 'हे लोक इतकंच जेवतात?'
माझा भाऊ म्हणाला 'अरे त्या लोकांना फक्त इतकंच जेवलं तर चालतं. त्यांना बुद्धी चालावावीच लागत नाही. फक्त हातआणि पाय. 'आपली' कामं बुद्धीची असतात. म्हणून आपल्याला भाज्या, कोशिंबिरी यातून vitamins, minerals ची गरज असते.'
श्रमजीवी माणसाने वापरलेली बुद्धी, बुद्धीजीवी माणसाने वापरलेल्या बुद्धीपेक्षा किती युनिट्सने कमी असते?
त्याच्या अंगाचा वासामुळे तिरस्काराने नाक बंद केल्याची मला लाज वाटायला लागली.

Sunday, July 12, 2009

मी का बोलतो?

मला बोलावसं वाटतं
म्हणून मी बोलतो
कोणी ऐकेल
म्हणून मी बोलतो.
कोणीतरी ऐकेल
म्हणून मी बोलतो.
कोणी ऐकणार नसेल
तरीही मी बोलतो


लोक बोलतात
म्हणून मी बोलतो.
लोक बोलतील
म्हणून मी बोलतो.
लोक बोल लावतील
म्हणून मी बोलतो.


मी तोंडाने, पेनने बोलतो
मी ब्लॉगवरून, ट्विटरवरून बोलतो
मी माझ्या केशभूषेतून, वेशभूषेतून बोलतो
मी माझ्या डोळ्यांनी, कानांनीही बोलतो

मी माउथ ऑर्गन मधून बोलतो
न बोलताही बोलण्याचा प्रयत्न करतो


तुम्ही मान्य कराल
आपण बोलण्यातून जगतो
आपण जगण्यातून बोलतो