Sunday, April 25, 2010

शाळा माझी, तिची

(एक कथा)


काही दिवसांपूर्वी facebook वर
एका शाळेतल्या मैत्रिणीला add केलं
एकाच तुकडीत होतो आम्ही.
१०-११ वर्षाची gap मोठी असते तशी
पुरेशीही, अपुरीही, माणूस बदलायला


कॉफी प्यायला भेटू म्हणाली
मी म्हणालो जेवायलाच भेटू
जास्त वेळ बोलता येईल, म्हणून
शाळेत बरंच काही बोलायचं असायचं
शाळेतली आणि आताची gender logics वेगळी होती.


एका हॉटेलच्या roadside space मध्ये बसलो होतो
म्हणाली, इथे फार धूळ आहे, आत जाऊ
'शाळेत असताना मैदानात मातीत बसून डबे खाल्ले होते.'
मी आठवण करून दिली. नुसता उच्छ्वास टाकून 'हो' म्हणाली
शाळेचा विषय काढला की काहीच बोलायची नाही


निघतांना विचारलं, 'काय झालंय? शाळेबद्दल बोलणं का टाळत होतीस?'
म्हणाली, 'तुझी शाळा आणि माझी शाळा वेगळी होती.'
माझी शाळा तुझ्या शाळेइतकी रम्य वगैरे नव्हती,
आठवण काढण्यासारखी तर मुळीच नव्हती, त्रास होतो आठवल्यावर'


गाडीला किक मारली, काठोकाठ डबडबलेल्या डोळ्यातून हसली, निघून गेली.

Thursday, February 18, 2010

प्रसन्न

माझे एक सिनिअर कलीग,
म्हणत होते घर रंगवायला काढलं आहे.
कैक वर्षात भिंतींना रंगाचा हात लागला नव्हता.
सध्या सगळा संसार आमचा एकाच खोलीत असतो
कधी बेडरूम मध्ये फ्रीज तर कधी बाल्कनीत स्वयंपाक असतो
घरात असतांना सारखा नाकात रंगाचा वास जात असतो


हो, पण आता प्रसन्न वाटतं आहे सगळं, refreshing ही


रेहेमीच प्रसन्न असणारे आज आणखीनच खुललेले दिसले.
म्हणाले 'चल, चहा पिऊन येऊ.'
रंग लावताना येणाऱ्या अडचणी सांगून खळखळून हसत होते.


मनात आलं, अशीच लोकं हवीत आजूबाजूला
प्रत्येक क्षण समरसून जगणारी.

Thursday, January 21, 2010

दिसणं

माणसाचे कपडे देखील उद्धट वाटू शकतात असं मला वाटतं. कपड्यातून आपण बोलत असतो. शांत, समंजस, रागीट, प्रेमळ असे कपड्यांचे प्रकार आपण पाडू शकतो.
सौम्य रंगाच्या कॉटनच्या साड्या घालणाऱ्या स्त्रिया प्रेमळ असतात असा माझा समज आहे. घरात वावरताना माझ्या आई किंवा आजीचे कपडे तसेच असल्याने माझा मेंदू कदाचित असं ट्रेन झाला असेल.
FabIndia मध्ये मिळतात तसे कपडे वापरणाऱ्या मुली मला उगाच चळवळीत भाग घेणाऱ्या नवयुवती किंवा पत्रकार (धडाडीच्या) किंवा क्रिएटीव रायटर वाटतात. असं का वाटतं याचा विचार केल्यावर लक्षात येतं की याला लॉजिक काहीच नाही.
नुकतंच एका जाहिरातीत ऐकलं, की बहुत करून आपण नुसतं डोळ्यांनीच पाहतो. मेंदूने पाहताच नाही. माझाही खुपदा असंच होतं. नुसतं दिसण्यावरून, निटनेटकेपणावरून, कपड्यावरून, मी  माणसं  जज करतो आणि मजबूत फसतो.
गेल्या काही दिवसात माझे सगळे असले 'बालिश' समज बदलत आहेत. मुळात लोक त्यांचे कपडे, बोलणं, वागणं, असणं या सगळ्याहून खूप वेगळी असतात.


'आयुष्य हा एक रंगमंच आहे' का काय म्हणतात ते साफ खोटं नाही.

Monday, January 11, 2010

खंबीर

'काळजी नको करू. ठीक होईल सगळं.'
ती त्याला फोनवर समजावत होती.
एका हाताने कॉम्प्युटर वर
कामाचा ढिगारा उरकत होती.


कर्ता पुरुष होता तो
पण ही 'सावरती' स्त्री होती
हृदयाच्या कोपऱ्यातून घाबरली तरी
मेंदूच्या वळकट्यातून खंबीर होती.