Sunday, August 23, 2009

मला भेटलेली भक्ती


आज गणेश चतुर्थी आणि त्यात रविवार. पण आम्हाला ऑफ़िसला सुट्टी नाही. म्हटलं सणवार आहे, जरा बरे कपडे घालून बाहेर पडूया. घरातून बाहेर पडतांना विचार केला जातांना एखाद्या गणपतीच्या देऊळात जावं.
मी राहातो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडलं की समोर एक सुंदर, पाचूसारखी हिरवी टेकडी आहे आणि थोडं पुढे गेलं की अत्यंत देखणा पाषाण तलाव. या दोघांच्या मधे एक छान शंकराचं मंदिर आहे. तिथे एक काळ्या दगडातली गणपतीची मूर्ती आहे. तिथेच नमस्कार करून पुढे जायचं ठरवलं.
जिना उतरतांना उदबत्त्यांचा, फुलांचा आणि नैवेद्याचा एकत्रित वास येत होता. सुगंध आतल्या आरासाचं दृष्य डोळ्यांपुढे उभं करत होता. मी आता मंदिरातला गणपती पाहायला उत्सुक झालो होतो.
मंदिरात फारशी गर्दी नव्हतीच. गणपती तिथला मेन देव नसल्यामुळे असेल. एक जोडपं आणि त्यांची छोटी मुलगी असे तिघेच तिथे होते. मंदिराच्य आवारात शिरल्यावर चपला काढायला एक स्टॅंड आणि पाय धुवायला नळ आहे.
तिघही छान तयार होऊन आले होते. त्या छोट्या मुलीच्या हातात एक दूर्वांची जुडी आणि एक फुलांची माळ होती. तिघांनिही नळावर पाय धुतले. मुलीने पाय धुतल्यावर तिच्या बाबांनी तिला उचलून खान्द्यावर घेतलं. आत मी त्यांच्या मागेमागेच गेलो. मुलीने आपले इवलेसे हात वर करून घंटा वाजवली. शंकराच्या गाभाऱ्याच्या दारावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. त्या मूर्तीला तिने हार घातला. दूर्वा वाहिल्या. वडीलांच्या खांद्यावर बसूनच तिने नमस्कारही केला.
मनात आलं आपल्यातले बरेच लोक जसं काहीतरी देवाकडे मागतात तसं तिने काहीच मागीतलं नसणार. तिच्यासारखी भक्ती करता यायला हवी. निखळ. निर्व्याज.
गणपतीपुढे त्यांनी ठेवलेले छोटे छोटे मोदक तिने तिथल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. माझ्याजवळ आल्यावर मी तिला विचारलं
’तुझं नाव काय?’
ती कॉन्फ़िडंट्ली म्हणाली
’भक्ती.’
देवाच्या खऱ्या भक्ताचं दर्शन व्हायलाही नशिब लागतं म्हणतात.

Wednesday, August 19, 2009

वीकएंड कॉफी

तलाव कंटाळला स्तब्धतेला
वाटलं त्याला वाहात सुटावं
नदी बोअर झाली वाहतेपणाला
तिला वाटलं स्तब्ध राहावं

दोघं भेटले वीकएंडला, कॉफी प्यायला.
नदी म्हणाली
'जाम पकले रे वडवड करून'
तलाव बोलला
'सॉलिड कंटाळलो रुटीनला
जावं कुठं तरी निघून'

नंतर दोघांनी भरपूर गप्पा मारल्या
नदी बोलत होती
काठावरल्या लोकांबद्दल, त्यांच्या कष्टांबद्दल
उड्या मारणाऱ्या नागड्या पोरांबद्दल
स्वच्छ व्हायला येणाऱ्या गाई-गुरांबद्दल

कॉफीमुळे तजेला आलेला तलावही बोलला
मासे पकडणाऱ्या कोळ्यांबद्दल
डोंगराच्या सावलीबद्दल
बोटींग करणाऱ्या हसऱ्या जोडप्यांबद्दल

ठरलं, असंच वीकएंडला भेटायचं
TTMM बिल देऊन दोघं निघाले
नदी, तिच्या लोकांकडे, उड्या मारणाऱ्या पोरांकडे
तलाव, त्याच्या कोळ्यांकडे, डोंगराच्या सावलीकडे